कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ

कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांऐवजी कागदोपत्री डंपर आणि डिलीव्हरी व्हॅनची नोंद केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेचे लक्ष वेधले.अखेर या संदर्भात चर्चेसाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात लवकरच बैठक आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कळवा-मुंब्रा प्रभाग समितीत घनकचरा व्यवस्थापनाचे २०१७ ते २०२२ पर्यंतच्या कंत्राटाबाबत पवार यांनी सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये टाटा एसीई आणि ७०८ एसीई वाहने असलेल्या घंटागाड्यांऐवजी काही गाड्या चक्क डंपर आणि डीलिव्हरी व्हॅन असल्याचे आरटीओतील कागदपत्रांत आढळले. निविदा रक्कमेच्या ५० टक्के इन्कम टॅक्स टर्नओव्हरची अट होती. मात्र कंत्राटदाराचा टर्नओव्हर केवळ सात ते आठ लाखांचा आहे. या मुद्द्यांकडे नारायण पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर या प्रश्नावर महापौरांच्या दालनात लवकरच बैठक घेतली जाईल अशी घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading