कळवा पोलीसांनी २० गुन्हे उघडकीस आणून साडेसोळा लाखाहून अधिक रक्कमेचा ऐवज केला हस्तगत

कळवा पोलीसांनी २० गुन्हे उघडकीस आणून साडेसोळा लाखाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला असून ५ जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. कळवा पोलीस ठाणे परिसरात होणा-या घरफोडी आणि वाहन चोरीवर प्रतिबंध आणण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना आणि मार्गदर्शन केलं जात होतं. त्यानुसार अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित गस्त, नाकाबंदी, संशयित वाहनांची तपासणी, संशयित व्यक्तींवर नजर अशा गोष्टी केल्या जात होत्या. नियोजनबध्द गस्त आणि नाकाबंदी केली जात असताना कळवा पूर्व परिसरात काही व्यक्ती एका रिक्षामधून संशयितरित्या वावरताना पथकाला दिसून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता हे सर्वजण पोलीसांच्या नोंदीवरील गुन्हेगार असल्याचं समोर आलं. युसुफ शेख, पंकज मौर्या, आकाश घाडगे, आकाश विश्वकर्मा आणि सुभाष यादव अशा ५ जणांन पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १० लाखांचे साडेतीनशे ग्रॅम वजनाचे दागिने, ३ लाखांच्या २ ऑटो रिक्षा, साडेतीन लाखांच्या ५ दुचाकी, ४ मोबाईल आणि १० हजार रूपयांची रोकड असा १६ लाख ६६ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या ५ जणांचे घरफोडीचे १३ तर वाहनचोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. रेल्वे स्थानकापासून जवळ असणा-या निवासस्थानामध्ये घरफोडी करून पळून जाण्याची तर महामार्ग अथवा हमरस्त्यापासून जवळ असणारी वाहनं चोरी करून तात्काळ घटनास्थळावरून पसार होण्याची या ५ जणांची पध्दत होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading