कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे ३ लाख ४४ हजार ३४३ मतांनी विजयी झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या या विजयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं कायम राखला आहे. आनंद परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं कल्याणमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यावरून शिवसेनेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र उच्चशिक्षित उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली होती. या मतदारसंघात मिळालेल्या उमेदवारीचं चीज करत श्रीकांत शिंदे त्यावेळी २ लाख ५० हजार ७४९ मतांनी निवडून आले होते. यंदा तर ते यापेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यामुळं पुढील दोन निवडणुका तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. काल झालेल्या मतमोजणीत श्रीकांत शिंदे यांना ५ लाख ५९ हजार ७२३ मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांना २ लाख १५ हजार ३८० मतं मिळाली. त्यामुळं श्रीकांत शिंदे हे ३ लाख ४४ हजार ३४३ मताधिक्क्याने निवडून आले. या निवडणुकीत आगरी कार्ड खेळण्यात आलं होतं. मात्र तरीही गतवेळेपेक्षा ९४ हजाराहून अधिक मतांनी श्रीकांत शिंदे निवडून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातही जवळपास १३ हजार १२ मतदारांनी यापैकी कोणीही नाही म्हणजे नोटाचा वापर केला. या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी श्रीकांत शिंदे यांना ६२.८७ टक्के मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading