ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार

ओला चालकाने नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात बहादुर द्वारकाप्रसाद, अरूण प्रसाद आणि श्वेता प्रसाद या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ऐरोली येथे राहणारे बहादुर प्रसाद हे ओला कार चालक असून अंधेरीहून नौपाडा भागात ते दोन प्रवाशांना घेऊन येत होते. मात्र मीटरवरील पैशांमधून दोघांचा वाद झाला. यानंतर या प्रवाशांनी त्यांच्या आणखी एका साथीदाराला बोलावून बहाद्दूरला मारहाण केली. बहादुर हे नौपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.यानंतर बहादुरला पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांनी फोन करून बोलावले.त्यानुसार दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येताना बहादूर प्रसाद यांनी मुलगा अरूण आणि मुलगी श्वेता यांनाही सोबत आणले. बहादुर हे फिर्याद देत असताना अरूण आणि श्वेता हे आवाज चढवून गोंधळ घालत होते.नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे त्यांना शांत बसण्याचे आवाहन करीत होते.तेव्हा, श्वेता हिने निरीक्षक धुमाळ यांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर उपनिरीक्षक मोहीनी कपिले या श्वेताला अडविण्यासाठी गेल्या असता त्यांना या तिघांनी धक्काबुक्की केली अशी तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading