एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचा भर – एकनाथ शिंदे

एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यासाठी राज्यात आता महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबिराचा राज्यस्तरीय शुभारंभ ठाण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिरांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. 16 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये आबालवृद्धांच्या सर्व आरोग्य तपासण्या, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यात 1100 आरोग्य वर्धिनी केंद्र सध्या सुरू असून 5200 उपकेंद्रांचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये केले जाणार आहे. डायलिसीसची सुविधा, कर्करोगाची तपासणी, टेलिमेडिसीन अशा सुविधा देखील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाकरे यांच्या हस्ते 16 जिल्ह्यांतील महाआरोग्य शिबिरांच्या उद्घाटनाबरोबरच गडचिरोली जिल्हा रूग्णालयातील सीटी स्कॅन सेंटरचे ई-उद्घाटन करण्यात आले. महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेल्या विविध जिल्ह्यांमध्ये मान्यवरांनी यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी कायाकल्प कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपजिल्हा रूग्णालय, शहापूर, स्त्री रूग्णालय उल्हासनगर, ग्रामीण रूग्णालय बदलापूर आणि ग्रामीण रूग्णालय टोकावडे यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading