उपनगरीय गाडीतून पडून एक प्रवासी ठार तर दोनजण गंभीर जखमी

उपनगरीय गाडीतील गर्दीचा भार सहन न झाल्यामुळं गाडीतून पडून एक प्रवासी ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. काल सकाळी गर्दीच्या वेळी वेगवेगळ्या तीन अपघातात हे प्रवासी जखमी झाले. सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत मुंब्रा आणि कळव्यामध्ये हे अपघात झाले. मुंबईकडे जाणा-या गाडीत हाजी अहमद हा फूटबोर्ड वरून प्रवास करत असताना गर्दीमुळे खारेगावजवळ खाली पडला आणि जागीच ठार झाला. इम्तियाज शेख आणि अबु ओसामा हे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हाजी अहमद हा उत्तरप्रदेशचा असून तो मुंबईमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला आला होता. इम्तियाज शेखनं मुंबईला जाणारी ९.२८ची गाडी पकडली होती. गाडीतील गर्दीमुळे दरवाजात लटकत प्रवास करणा-या इम्तियाजचा हात सटकला आणि तो खाली पडला. अबु ओसामा हा मेकॅनिक म्हणून काम करतो तो मुंबईला जात होता. त्याचाही गाडीतील गर्दीमुळे तोल गेल्यामुळे अपघात झाला. त्याच्या लहान भावाचाही काही महिन्यापूर्वी असाच रेल्वेमधून पडून अपघात झाला होता. मुंब्र्यामध्ये येणा-या गाड्या या आधीच भरून येत असल्यामुळं मुंब्र्यातील प्रवाशांना गाडीत चढणंही मुश्कील होतं त्यातूनच हे अपघात घडत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading