ईडीच्या कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखलं

ईडीच्या कार्यालयावर निघालेल्या राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलीसांनी तीन हात नाक्यावरच रोखून धरलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईला निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांना शहराच्या विविध ठिकाणी अडवण्यात आलं. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातूनच ताब्यात घेण्यात आलं. शरद पवार हे आज स्वत: अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले. त्यामुळं देशभर खळबळ उडाली. यावेळी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारो कार्यकर्ते अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात जातील असं लक्षात आल्यावर पोलीसांनी सर्वत्र धरपकड केली. शहराच्या विविध भागातून ४० बसगाड्या आणि अन्य वाहनातून जाणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना पोलीसांनी कार्यालयाबाहेरच अडवून पोलीस व्हॅनमध्ये कोंबून अटक केली. अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर जमावबंदीचा आदेश मोडल्याचा गुन्हा नोंदवून नौपाडा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं होतं. सरकारनं आज जरी पोलीस बळाचा वापर करून रोखलं असलं तरी सामान्य जनता आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनातील उद्रेक २४ ऑक्टोबरला दिसेल असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading