इको गाडीच्या सायलेन्सर मधून प्लॅटिनम ची चोरी करणा-या टोळीस गजाआड करण्यात कळवा पोलीसांना यश आलं आहे. ही टोळी फक्त मारुती सुझुकी कंपनीच्या ईको गाडीचे सायलेन्सर चोरत असल्याचं उघडकीस आलं आहे. रोशनी राऊत यांच्या इको कार मधून सायलेन्सर चोरी झाल्याची तक्रार त्यांनी पोलीसांकडे दिली होती. त्या अनुषंगाने शोध घेत सापळा रचून समशुद्दीन शहा, नदीम कुरेशी, समशुद्दीन खान आणि सद्दाम खान यांना कुर्ला येथून ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या चौकशीत त्यांनी सायलेन्सर चोरी केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यांच्याकडून २५ सायलेन्सर हस्तगत केले आहेत. सायलेन्सर मध्ये असलेला प्लॅटिनम धातू वितळवून बाजारात विकण्याचे काम ही टोळी करत होती. पोलीसांनी या टोळीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली आहे.