आमदार सरनाईकांचे पत्र म्हणजे झोपी गेलेला जागा झाला – मनोहर डुंबरे यांचा टोला

ठाणे शहरातील थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कमधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची महापौर-आयुक्तांकडे मागणी म्हणजे झोपी गेलेला जागा झाला असा टोला गटनेते मनोहर डुंबरे यांनी मारला आहे. सरनाईक यांच्या मतदारसंघात नवे ठाणे-जुने ठाणे हे थीम पार्क, तर वर्तकनगर भागात बॉलीवूड पार्क उभे आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्यासंदर्भात साडेतीन वर्षांपासून आरोप होत आहेत. सरनाईक यांची पत्नी आणि मुलगा महापालिकेत नगरसेवक आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचारावर अनेक वेळा चर्चा झाली. या संदर्भात नेमलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर करून सव्वा दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तोपर्यंत मौन धारण करणाऱ्या प्रताप सरनाईकांना आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकशी अहवाल आठवला आहे असा टोला मनोहर डुंबरे यांनी लगावला. त्यामुळे साडेतीन वर्षे थीम पार्क भ्रष्टाचारावर झोपी गेलेले सरनाईक आता जागे झाले आहेत असे म्हणता येईल, असे डुंबरे यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी आणि संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासून मागणी आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांची चौकशी करण्याचाही आग्रह आहे. मात्र, त्याबाबत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने टोलवाटोलवी केली. या प्रकल्पांसाठी नियुक्त केलेला सल्लागार हाच कंत्राटदार झाला, हे गौडबंगाल आहे, याकडेही डुंबरे यांनी लक्ष वेधले. या प्रकरणातील गैरव्यवहारांबाबत सरनाईक यांनी निश्चितपणे विधीमंडळाच्या सभागृहात चर्चा घडवून आणावी. या चर्चेचे भाजपा स्वागत करीत आहे असा टोलाही मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading