आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील इतिहासकालीन विहीर स्वच्छ

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील इतिहासकालीन विहीर स्वच्छ झाली असून या विहिरीतील पाणी स्थानकातील स्वच्छतागृहांना दिलं जाणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातील ठाणे पूर्वला फलाट क्रमांक १० च्या बाहेर एक मोठी विहीर होती. ब्रिटीश काळात ही विहीर बांधण्यात आली होती. कालांतरानं या विहिरीकडे दुर्लक्ष झाल्यानं ही विहिर बुजण्याच्या मार्गावर होती. सुरक्षेच्या दृष्टीनं या विहीरीवर पत्रे टाकून ही विहीर बंद करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वरिष्ठ अधिका-यांसमवेत या विहीरीची पाहणी करून विहीर स्वच्छ करण्याचा आग्रह धरला होता. रेल्वे प्रशासनानं त्यावेळी ही विहीर स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार रेल्वे प्रशासनानं ही विहीर स्वच्छ केली असून विहीरीतील कचरा काढला आहे. या विहीरीतील पाणी आता पिण्यायोग्य नसलं तरी त्याचा वापर स्थानकातील स्वच्छतागृहांना करता येईल असं केळकर यांनी सांगितलं. रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये नेहमीच पाण्याची समस्या असते. त्यामुळं या पाण्याचा वापर स्वच्छतागृहांमध्ये झाला तर स्थानकातील पाण्याचा प्रश्नही मिटेल आणि प्रवाशांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास संजय केळकर यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading