आमदार संजय केळकरांनी अधिवेशनात ३२ विषयांना फोडली वाचा

पावसाळी अधिवेशनात आ. संजय केळकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्यासह भिवंडी, वाडा, पालघर ते थेट सातारा येथील ३२ विषय मांडुन त्यांनी समस्यांना वाचा फोडली. मागील अधिवेशनात उपस्थित केलेल्या ३५ विषयांपैकी निम्मे विषय मार्गी लागल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित इमारतींना पुनर्विकासाची परवानगी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. इमारतींचे आयुष्यमान वाढवण्यासाठी इमारतींच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या शेड नियमानुकुल करावी. रस्त्यावरील झाडांप्रमाणेच गृहसंकुलातील झाडांच्या फांद्यांची छाटणी निःशुल्क करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. वृक्ष कोसळुन बळी पडलेल्या वकिलाच्या पत्नीला पालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी. सदनिका न देता फसवणुक करणाऱ्या विकासकांचा भंडाफोड तसेच येऊरमधील वनवासींच्या जमिनीवरील बंगले, ढाबे, अतिक्रमण धारकांवर कारवाई करावी. ठाण्यातील ६०५ कोटींच्या रस्त्यांची बिले थर्ड पार्टी ऑडीट न करता महापालिकेने अदा केल्याची बाब सभागृहात उघड केली. मॉडेला येथील भुखंडावर ट्रक टर्मिनस उभारावे, शहरातील हुक्का पार्लर कायमस्वरुपी बंद करावे. वर्तकनगरचा म्हाडा इमारतींचा पुर्नविकास तसेच पोलीस वसाहतींच्या दुरुस्ती निधीत वाढ करावी, तसेच ठाण्यातील बीएसयुपी योजनेतील बोगस लाभार्थींबाबत चौकशी समितीचा अहवालानुसार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.शहरी भागात अकृषिक कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा.कोपरी क्रीडा संकुलाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करून हे संकुल त्वरित सुरू करावे. मुंबई एन्ट्री पॉइंटवर टोल टप्प्या टप्प्याने कमी करण्यात यावा. सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काने नोकरी देताना जात प्रमाणपत्राची अट रद्द करण्यासह वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. कंत्राटी पध्दतीने पोलीस भरती करू नये, पोलिसांच्या निवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करावे. ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असल्याने राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सुमारे २२५ शिक्षकांच्या भरतीचा प्रस्तावाला मंजुरी द्यावी. वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याची अंमलबजावणी करावी. कोरोना काळात काम केलेल्या ६० परिचारिकांसह आरोग्य विभागातील ८०० कर्मचाऱ्यांना नियमित काम द्यावे. पळून आलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या समतोल फाउंडेशनसह इतर संस्थांना शासनाने जागा आणि सुविधा उपलब्ध करून द्यावे, तसेच ठाणे कारागृहात कैद्यांची संख्या लक्षात घेता कारागृहाच्या उर्वरित जागेवर नवीन इमारत बांधणे आदी समस्यासह वाडा तसेच सातारा येथील प्रश्नही संजय केळकर यांनी सभागृहात मांडले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading