महसूल सप्ताहाची सांगता – 18 तरुणांना नियुक्तीपत्र

ठाणे जिल्हा प्रशासनाने गेल्या सात दिवसांपासून राबविलेल्या महसूल सप्ताहाची सांगता 17 तरुणांना तलाठी पदावर आणि एका जणास शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यावेळी महसूल सप्ताहात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. महसूल विभागाच्या वतीने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध दाखले वाटप, युवा संवाद अंतर्गत युवकांपर्यंत महसूलच्या सेवा पोहोचविणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे आणि सेवा देण्यासाठी जनसंवाद कार्यक्रम, माजी सैनिकांसाठी सैनिकहो तुमच्यासाठी, माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी संवाद कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील विविध तालुक्यात करण्यात आले. या सप्ताहाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. यावेळी महसूल सप्ताहाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा तसेच तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्वावर केलेल्या नियुक्त्यांचे प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे म्हणाल्या की, महसूल विभाग हा वर्षभर विविध प्रकारची कामे करीत असतो. मात्र, या कामांची दखल या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने घेतली जात आहे. महसूल विभागाशिवाय शासनाचे कोणतेही काम पूर्ण होत नाही. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने अल्पसंख्यांक महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींपर्यंत महसूलचे काम पोहोचविले तसेच मुरबाडसारख्या दूर्गम भागातही महसूल विभागाचे काम पोहोचविण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपण गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची नोंद ठेवावी. तसेच प्रत्येकाने एक संघ म्हणून काम केले तर चांगले काम उभे राहू शकले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading