आमच्या सरकारने जी रेषा मारलीय त्यापेक्षा मोठी रेषा ठाकरे सरकारनं ओढण्याचा देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

जुन्या सरकारनं जे केलंय ते वाईट असल्याचं दाखवणं योग्य नसून आमच्या सरकारने जी रेषा मारलीय त्यापेक्षा मोठी रेषा या सरकारनं ओढावी असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना ठाकरे सरकारला दिला. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवण दिली त्यामार्गानं राज्य कारभार आखला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ख-या अर्थानं करून दाखवलं. विशेष म्हणजे महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित करून सामान्यातल्या सामान्यापर्यंत जागृती निर्माण केली. शिवरायांची शिकवण विसरला तर महाराष्ट्र धर्म टिकणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. सध्या महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून छत्रपती शिवरायांनी महिला सुरक्षेला जसं प्राधान्य दिलं तर त्याच धर्तीवर या सरकारनं कठोर कायदे केल्यास त्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असं त्यांनी स्पष्ट केलं. वृक्ष लागवडीवरून सध्या उठलेल्या वादंगावर बोलताना फडणवीस म्हणाले गेल्या ५ वर्षात सुधीर मुनगुंटीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून तिचे जिओ टॅगिंगही झालेलं आहे. वृक्ष लागवडीला लिम्का बुकनं ॲवॉर्ड दिलं असून त्याचं संपूर्ण रेकॉर्ड आहे. आमचा सर्व कारभार पारदर्शी आहे. केवळ जाणीवपूर्वक जुन्या सरकारनं जे केलंय ते वाईट दाखवायचा प्रयत्न होतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading