जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरा करण्यात आला. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथमधील शिवमंदिर, कल्याणच्या पारनाक्यावरील शिवमंदिर अशा अनेक मंदिरातून सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. मंदिरांसमोरचा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. ठिकठिकाणी विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून येथील महादेवाची पिंडी देशातील दुस-या क्रमांकाची भव्य पिंडी असल्याचं सांगण्यात येतं. महादेवाचं दर्शन घेण्यासाठी विविध शिवमंदिरात भक्तांच्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत होतं. ठिकठिकाणी शंकराच्या पिंडीवर भाविकांकडून दूधाच्या पिशव्या रित्या केल्या जात होत्या. मात्र यामुळं हजारो लिटर दूध मातीमोल होत होतं.