आनंद सावलीतील महिला तब्बल १२ वर्षानंतर एकत्र

महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आनंद सावली गृहसंकुलातील महिला तब्बल १२ वर्षाने प्रथमच एकत्र आल्या. या महिलांनी जल्लोष करीत आनंद साजरा करण्याबरोबरच एकमेकींशी हितगुज केले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाचपाखाडी येथील झोपडपट्टीतील रहिवाशांकडून आनंद सावली गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यात आली होती. मात्र, इमारत साकारताना अनेक तांत्रिक अडथळे आले. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर, सुमारे ५०० हून अधिक रहिवासी ठिकठिकाणी राहण्यास गेले. १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गेल्या महिन्यात रहिवाशांना घरांचा ताबा मिळाला. नारायण पवार यांच्या पुढाकाराने महिलांसाठी चला खेळ खेळू या पैठणीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला सुमारे ५०० महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विजेत्यांना सोन्याची नथ आणि पैठणी, चांदीचे पैजण आणि पैठणी, चांदीचा छल्ला आणि पैठणी यांच्यासह उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. त्याचबरोबर विविध क्षेत्रात कर्तृत्ववान कामगिरी करणाऱ्या तीन महिलांचा सत्कार करण्यात आला. आनंद सावली गृहसंकुलातील महिलांना खूप वर्षांनंतर एकत्र येता यावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading