आत्तापर्यंत १५ जणांनी बेकायदेशीर लस घेतल्याचं उघड

बेकायदेशीर लस प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत १५ जणांनी बेकायदेशीर लस घेतल्याचं उघड झालं आहे. महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथे अभिनेत्री मीरा चोप्राला झालेल्या बेकायदेशीर लसीकरणानंतर महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या समितीनं केलेल्या तपासावरून आत्तापर्यंत २१ जणांची अशाप्रकारे बनावट ओळखपत्र तयार करून त्यातील १५ जणांनी बेकायदेशीर लस घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण बंद असतानाही महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात मीरा चोप्रा या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्कर असल्याचं दाखवून लस देण्यात आली होती. ओम साई आरोग्य सेवा या संस्थेनंच हे बनावट ओळखपत्र तयार करून अशाप्रकारे लस दिल्याची माहिती समोर आल्यानंतर उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशीअंती या समितीनं सादर केलेल्या अहवालात १९ जणांना सुपरवायझर तर दोन जणांना अटेंडंट असल्याचं बनावट ओळखपत्र देण्यात आल्याचं उघड झालं आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असून तिने अद्याप लस घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading