आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

आता वर्षातून ४ वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे.
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आतापर्यंत वर्षातून एकच 1 जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवा मतदारांनी तसेच आतापर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ही यादी निर्दोष आणि परिपूर्ण असावी, यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय प्रयत्नशील असते. जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी 9 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही अशी तक्रार अनेक मतदाराकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे असे शिनगारे यांनी सांगितले. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. या कालावधीत मतदार नोंदणीबरोबरच एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेता येणार आहेत. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी या अपात्र मतदाराची वगळणीही महत्त्वाची असते. यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19- 20 नोव्हेंबर आणि 3-4 डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातही विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच वंचित घटकासाठीही खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट यांच्या सहकार्याने मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन अशोक शिनगारे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading