अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

ठाणे शहरातील मुख्य महामार्ग आणि घोडबंदर रस्त्यावर आज पुन्हा झालेल्या वाहतूककोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेऊन अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. पालकमंत्री बुधवारी स्वतः नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहाणी करणार असून सुयोग्य जागा निश्चित करून त्या ठिकाणी पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवर गायमुख येथे ऑइल टँकर उलटल्यामुळे आज वाहतूक कोंडी झाल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलिस, वाहतूक पोलिस, ग्रामीण पोलिस, ठाणे महापालिका आदी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली. रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी या जागांची पाहणी शिंदे करणार आहेत. जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत, तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी-सोनाळे-दापोडे येथे नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी, अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे थांबवण्यासाठी, ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading