अनंत करमुसे प्रकरणात उच्च न्यायालयाचे त्यांच्यावर ताशेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. करमुसे याचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. अनंत करमुसे याने जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे याला समन्सपत्र बजावण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे याच्या जप्त केलेल्या फोनमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. मात्र, असे असतानाही करमुसे याने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी करमुसे याने स्वतःच्या मोबाईल फोनमधुन स्वतः चे फेसबुक अकाउंटवरून आव्हाड यांचा एडीट केलेला अश्लिल फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने हा मोबाईल फोन जप्त करून फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरविणार्‍या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक, ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पाच वर्षे अनंत करमुसे हा जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत असून त्याला या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे 5 वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. करमुसेची सर्व ट्विट्स उच्च न्यायालयात जेव्हा मांडण्यात आले तेव्हा, ही माहिती करमुसे याने दडवून ठेवली असल्याने याचिकाकर्त्याचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नसल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading