ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने कार्यशाळा

आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने वायू प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष केंद्रीत करुन सामूहिक उत्तरदायीत्व आणि सामुहिक कृतीच्या आवश्यकतेबाबत जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन ठाणे महापालिका आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचेतर्फे करण्यात आले. पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, कार्यशाळा यांचे आयोजन ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे. याच मालिकेत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि उपआयुक्त अनघा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसाधना महाविद्यालयात कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी हवा सर्वेक्षणाबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विश्वस्त कमलेश प्रधान यांनी पर्यावरण संवर्धन कार्यात महाविद्यालय नेहमीच सहकार्य करेल असे आश्वासित केले. महाविद्यालयातील प्राध्यापक आसावरी टाक-शेणवाई यांनी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या यावर्षीच्या संकल्पनेस अनुसरून जागतिक स्तरावरील हवेच्या गुणवत्तेबाबत आणि हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांबाबत विस्तृत माहिती दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केंद्र शासनाकडून उपलब्ध अनुदानातून शहरात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याबाबत सादरीकरण केले. ठाणे महापालिकेचे वैज्ञानिक अधिकारी ओम परळकर यांनी हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत आंतरराष्ट्रीय तसंच देश पातळीवरील कायद्यांबाबत आणि नागरीकांच्या मूलभूत अधिकारांबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यानंतर महापालिकेचे वैज्ञानिक अधिकारी राजू जाधव यांनी हवा सर्वेक्षणाकरिता उपलब्ध असलेल्या विविध पद्धती आणि संसाधनांबाबत सादरीकरण केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading