अधिकृत ईमारतीनंतर एस आर ए योजना क्लस्टर मुक्ती कडे – संजय केळकर

अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील, प्राधिकरण प्रशासन याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

क्लस्टर योजनेचे ४४ आराखडे जाहीर झाल्यानंतर त्या अंतर्गत प्रक्रिया सुरू असलेले सुमारे १६ एसआरए प्रकल्प रखडले. त्यामुळे घरही नाही आणि विकासाकडून भाडेही नाही, अशी कोंडी झालेल्या या प्रकल्पांमधील हजारो कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली होती. क्लस्टर योजना कधी पूर्णत्वास येईल, याबाबत खात्री नसल्याने झोपडीधारक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त केले त्या प्रमाणे प्रक्रिया सुरू असलेल्या एसआरए प्रकल्पांना देखील क्लस्टरमुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली. आज दहा योजनांमधील प्रतिनिधींनी श्री.केळकर यांची भेट घेतली.या प्रतिनिधींसह श्री.केळकर यांनी आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ठाणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत श्री. सोमण यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती आ.केळकर यांनी दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासोबत तहसीलदार श्रीमती परदेशी, ठामपाचे अधिकारी राजकुमार पवार, नितीन पवार, माजी नगरसेवक नारायण पवार, ठाणे जिल्हा हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.अधिकृत इमारतींना क्लस्टरमुक्त करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवून पाठपुरावाही सुरू ठेवला होता. त्यास यश मिळाल्याने शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. या क्लस्टरमधून प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प देखील मुक्त करण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हे प्रकल्प देखील क्लस्टरमुक्त होतील, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.यावेळी पवनपुत्र को-ऑप हाऊसिंग सोसायटी-सिद्धार्थ नगर कोपरी कॉलनी, दत्तकृपा को-ऑप हाऊसिंग सोसायटी-जमुनाबाई चाळ, कोपरी कॉलनी, जय अंबे को-ऑप हाऊसिंग सोसायटी-करवालो नगर, वागळे इस्टेट, शिव औदुंबर सहकारी गृहनिर्माण संस्था, फर्नांडिस हाऊस को-ऑप हाऊसिंग सोसायटी-धोबी तलाव, मावळी मंडळ, साई दर्शन को-ऑप हाऊसिंग सोसायटी-नुरीबाबा दर्गा, सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था-पाटीलवाडी सावरकर नगर, स्वामी एकता रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था-जोंधळी बाग चरई, विष्णू मंजुळा ठाणेकर सहकारी गृहनिर्माण संस्था-ठाणेकर वाडी कोपरी कॉलनी आणि महाराष्ट्र दर्शन को-ऑप हाऊसिंग सोसायटी-शेलारपाडा या दहा योजनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.एसआरए प्रकल्पातील लाभ धारकांना घरांचे हस्तांतरण करण्यासाठी यापूर्वी साडेसात लाख रुपये आकारण्यात येत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर हे शुल्क असल्याने आमदार संजय केळकर यांनी शुल्क कमी करण्याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबतचा शासनाने अध्यादेश काढून शुल्क रक्कम अडीच लाख रुपयांवर आणली आहे. याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading