अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चांगल्या रंगचित्रांवर लाखोंची उधळपट्टी – राहुल पिंपळे यांचा आरोप

प्रत्यक्षदर्शी पुरावे पाठवूनही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने चांगल्या रंगचित्रांवर पुन्हा नव्याने रंगकाम करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी वारंवार होत असल्याचा आरोप समाजसेवक राहुल पिंपळे यांनी केला असून त्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. संपूर्ण शहरात भिंती रंगविणे, रंगचित्रे काढणे, सुशोभीकरणाची कोट्यावधी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत परंतु हे रंगकाम करताना काही ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत अवघ्या आठ महिन्यापूर्वी काढलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या रंगचित्रांवर प्रेशर गनने पाण्याचा मारा करून त्यांचा रंग उडवून पुन्हा त्या ठिकाणी नव्याने रंगचित्रे साकारली जात असल्याची बाब पिंपळे यांनी महापालिकेचे अधिकारी ढोले आणि मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत काढण्यात आलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या चित्रांवर पुन्हा रंगचित्रे काढण्यात येऊ नये, रंगचित्रे रेखाटताना त्या ठिकाणी रंग चित्रांची साईज कंपनीचे नाव आणि रंगचित्र काढल्याची तारीख नमूद करण्यात यावी, रंगकाम करण्यापूर्वी भिंतीलागत असलेले अडथळे माती डेब्रिज हटवून मगच रंगकाम करण्यात यावे,रंगचित्राच्या भिंती लगत पदपथाचे काम करताना सिमेंट अथवा इतर रंग उडवून रंगचित्र खराब केले असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करून खर्च वसूल केला पाहिजे, जबाबदार अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संकल्पनापूर्ण आणि दर्जेदार पद्धतीने रंगचित्रे काढण्यात यावीत परंतु असे होताना दिसत नाही. तरी या रंगचित्रे काढण्याच्या कामात नागरिकांच्या कररूपी पैशांच्या होणाऱ्या नासाडीबाबत संगनमताने जी अनियमितता घडून येत आहे त्या अनियमिततेबाबत कायदेशीर प्रक्रियेमध्ये चौकशी करून चांगल्या असलेल्या रंगचित्रावर पुन्हा नव्याने केलेल्या रंगकामाचे देयक अदा करण्यात येऊ नये अशी मागणी राहुल पिंगळे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading