मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयास राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला असून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि ठाण्यातील शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी २० कोटी रूपये उपयोगी पडणार असतील तर आडमुठे धोरण घेऊ नये असा टोला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लगावला आहे. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रास निधी देण्याऐवजी महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी हा निधी द्यावा अशी मागणी महापौरांनी केली होती. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात असावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड सिनेट सदस्य असताना त्यांनी याचा पाठपुरावा केला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची व्यवस्था तसंच विद्यापीठातील इतर प्रशासकीय कामांसाठी ही जागा उपयुक्त ठरते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामं उपकेंद्रातून होणार असतील तर ठाणेकरांच्या करामधील पैसा वापरला गेल्यास ते चुकीचं नाही असं मिलिंद पाटील यांनी म्हटलं आहे. कोट्यावधी रूपयांचा पाणी स्वच्छतेचा प्रकल्प हे केवळ स्वप्नरंजन आहे. गेली १५ वर्ष कचरा घोटाळा सुरू आहे. परिवहन सेवेमधील घोटाळा, जुने ठाणे नवीन ठाणे थीम पार्क घोटाळा तसंच नव्याने उघड झालेला चिक्की घोटाळा हे सर्व ठाणेकरांच्या खिशातील पैसे लाटणारे घोटाळे समोर येत असताना त्याबाबत ठोस भूमिका न घेता सत्ताधारी निधी का थांबवत आहेत असा प्रश्नही मिलिंद पाटील यांनी विचारला आहे.
