ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे. धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या एका निवेदनात ही मागणी केली आहे. जुने ठाणे नवे ठाणे प्रकल्पाची उभारणी करताना झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांची सध्या चर्चा सुरू असून सर्वसाधारण सभेतही यावर बरीच टीका झाली. सुमारे १६ कोटींच्या थीम पार्कचा चुराडा झाला आहे. नसलेल्या वस्तू आणि चित्रांचे पैसेही महापालिकेनं दिले आहेत. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा या तत्वावर बॉलिवूड पार्कचं काम दिलं असताना या कामासाठी २० कोटींचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. थीम पार्कच्या कामासाठी १३ कोटी तर न झालेल्या बॉलिवूड पार्कसाठी ६ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याप्रकरणी कोणालाही निलंबित करण्यात आलं नाही उलट आयुक्तांनी यामध्ये चौकशी झाली तर लोकप्रतिनिधींची पोलखोल करावी लागेल असं सांगून भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचा आरोप धर्मराज्य पक्षानं केला आहे. ठाणे महापालिका गेल्या आर्थिक वर्षात दीडशे कोटी रूपयांची करवसुली करण्यास असमर्थ ठरली आहे. एकूणच सर्व प्रकरणं बघता पालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: