राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील महेश आहेर यांच्यापासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले आहे. महेश आहेर यांच्या व्हायरल झालेल्या चार ऑडिओ क्लिप देखील विक्रांत चव्हाण यांनी पोलिसांच्या रेकॉर्डवर आणल्या असून या क्लिपमध्ये महेश आहेर यांच्याकडून मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांचा एकेरी उल्लेख झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. या संपूर्ण ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील महेश आहेर यांच्यापासून धोका असल्याचे ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. १५ मार्च रोजी महेश आहेर यांच्या चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यामध्ये मुख्यमंत्री तसेच ठाणे पोलीस आयुक्तांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. तर निकम नावाचे पोलीस अधिकारी आपल्याकडून दोन कोटी रुपये मागत असून मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना सांगितल्या नंतर हेच अधिकारी तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाही, तसेच मी माझ्यावर गावठी काट्याने फायरिंग करून ही फायरिंग आव्हाड यांनी केली अशी तक्रार करणार असे सर्व संभाषण आहेर या क्लिपमध्ये करत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. आम्ही महेश आहेर यांच्या विरोधात एवढे पुरावे देऊनही काहीच कारवाई होत नसून हे शासन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का ? आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर राज्य शासन आणि मुख्यमंत्रीही जबाबदार असतील असं विक्रांत चव्हाण यांनी म्हंटल आहे.