हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासून अतिवृष्टी सुरु झाली असून आज मुसळधार पावसात महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
गेले दोन दिवस महापालिका आयुक्त शहरातील नालेसफाई कामाची तसेच सखल भाग, रस्ते दुरूस्ती कामाची पाहणी करत आहेत. आज सकाळी पातलीपाडा येथून नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास त्यांनी सुरूवात केली. पातलीपाडा, बटाटा कंपनी, लोढा लक्झोरीया, थिराणी शाळा, भीमनगर, विवियाना मॉल तसेच लोढा येथील नाल्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिवृष्टी पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेविकांशी संवाद साधत प्रभागातील अडचणी संबंधित तसेच करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
अतिवृष्टीच्या पहिल्याच दिवशी शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही यासाठी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसामुळे वाहून आलेला कचरा तात्काळ उचलून नाल्याचे प्रवाह मोकळे करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.