ठाण्यामध्ये सभा घेण्यासाठी मैदानंच उरली नसल्यानं आता थेट रस्त्यावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानं न्यायालयाचा अवमान झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाण्यामध्ये प्रचारासाठी मोठी मैदानंच उरलेली नाहीत. सेंट्रल मैदानावर सभा घेण्यास बंदी आहे. गावदेवी मैदान शांतता क्षेत्रात मोडत असल्यामुळं तिथेही सभा होऊ शकत नाही. त्यामुळं आता थेट रस्त्यावर सभा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेसाठी सकाळपासूनच रस्ता बंद करण्यात आल्यामुळं ठाणेकरांची गैरसोय झाली आहे. सकाळी या सभेसाठी मंडप आणि इतर यंत्रणा उभी करण्याकरिता परमार्थ निकेतन आणि महापालिका अशा दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळं या रस्त्याचा वापर करणा-या ठाणेकरांना वळसा घालून इच्छीत स्थळी जावं लागलं. न्यायालयानं रस्ता अडवून कोणत्याही उत्सवाला परवानगी देऊ नये असे आदेश दिले आहेत. मात्र असं असतानाही रस्त्यावरच शिवसेनेच्या सभेला परवानगी देण्यात आल्यानं हा न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हटलं जात आहे.