ओला, ऊबर सारख्या खाजगी टॅक्स्या आरक्षित करून नंतर त्यातील चालकाला निर्जनस्थळी नेऊन त्याची कार पळवून नेणा-या एतेशामउद्दीन खान या सराईत चोरट्याला डायघर पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाखांच्य टॅक्सींसह ३ मोबाईल असा ४ लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. मुंब्रा, शीळ, डायघर भागात खाजगी मोटार कार आरक्षित करून त्या वाहनामधील चालकाला निर्जनस्थळी नेल्यानंतर कारची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनंतर पोलीसांनी केलेल्या तपासात या प्रकरणातील संशयित एतेशामउद्दीन खान याला ताब्यात घेण्यात आलं. व्यवसायानं चालक असलेल्या खान याने चौकशीमध्ये शीळ, डायघर आणि मुंब्रा परिसरात अशाप्रकारे वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.