कोरोना संदर्भात समाज माध्यमांवर खोट्या बातम्या अथवा अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात काही समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संदर्भात खोटी माहिती प्रसारीत केल्याप्रकरणी आत्तापर्यंत ६ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये कोरोना बाधित असल्याची खोडसाळ माहिती देणे, वैयक्तीक फायद्यासाठी अँटी कोरोना वस्तू बनवण्याचा खोटा दावा करणे, एखाद्या ठिकाणी गर्दी जमल्याची खोटी माहिती देणे अशा कारणांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं कोरोना संदर्भात खोट्या बातम्या अथवा चुकीची माहिती समाज माध्यमात प्रसारीत केल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला आहे. याप्रकरणी काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला अथवा १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.