कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि शीळ-कल्याण भिवंडी रस्त्यावरील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या पत्रीपूलाच्या ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर टाकण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी विक्रमी वेळेत ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. या गर्डरची लांबी ७६ मीटर आणि रूंदी साडेदहा मीटर आहे. या गर्डरपैकी १ मीटर पर्यंत गर्डरच्या लॉन्चिंगचं यशस्वी मॉब ड्रील करण्यात आलं. या गर्डरची खासदार श्रीकांत शिंदे यांनी हैद्राबाद इथे जाऊनही पाहणी केली होती. अशा कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राकरिता बराच कालावधी लागतो. पण खासदार शिंदे यांच्या विनंतीवरून सुरक्षा आयुक्तांनी एक आठवड्याच्या आत ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळं यातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. पत्रीपूलाचा हा गर्डर टाकण्यासाठी २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी चार तास तर २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी ३ तास असा मेगाब्लॉक असणार आहे.