रेल्वे कर्मचा-याच्या प्रसंगावधानामुळे एका बालकाचा वाचला जीव

रेल्वे पोलीस कर्मचा-याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका सहा वर्षीय बालकाचा जीव वाचू शकला. रविवारी संध्याकाळी मुंब्र्यातील फातिमा अन्सारी या आपल्या सहा वर्षाच्या आफताब या मुलाला घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघाल्या होत्या. मुंब्रा रेल्वे स्थानकात त्या उपनगरीय गाडीत चढल्या. पण गाडीत चढताना मुलगा आणि फातिमा या वेगवेगळ्या चढल्या. गाडीत चढल्यावर मुलाला जेव्हा आपली आई दिसली नाही त्यावेळी हा मुलगा गोंधळला आणि कशाचीही पर्वा न करता चालत्या गाडीतून त्यानं खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचा तोल गेला आणि तो फलाटावर पडला. याच वेळेला रेल्वे पोलीस कर्मचारी निलेश भाविसकर तिथे तैनात होते. त्यांनी या मुलाला पडताना पाहून त्वरीत धाव घेऊन त्या मुलाला उचलून बाजूला घेतले. त्यामुळं त्याचा जीव वाचू शकला. निलेश भाविसकर यांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचा जीव वाचू शकला याबद्दल रेल्वे प्रवाशांनीही त्यांचं कौतुक केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading