पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाण्यापुढील प्रवाशांच्या सेवेत ५० हून अधिक अतिरिक्त उपनगरीय गाड्यांच्या फे-या होतील असं सांगण्यात आलं. पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली त्यावेळी ही माहिती देण्यात आली. मुंब्रा रेतीबंदर येथे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या पिलरचं काम सुरू असताना ओहोटीच्या वेळी जमीन पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे पायलिंग रिंग मशिन खाडीत पडली. त्यामुळं खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरिष्ठ अधिका-यांसमवेत पाहणी केली. सुरक्षिततेची खबरदारी घेऊन काम करावं, आवश्यक असेल तर खाडी किनारी संरक्षक भिंत बांधावी अशी अनेक सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केल्या. खारेगाव येथील रेल्वेच्या टनेलपासून मुंब्रा स्थानकापर्यंत सव्वा किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधला जात असून यामध्ये ६५ पिलर आहेत. या पिलरची कामंही प्रगती पथावर आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेतीबंदरची जागा या प्रकल्पाला मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading