जलवाहिन्यांमध्ये साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड आढळल्यामुळे खळबळ

ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा येथील जलवाहिन्यांमध्ये पाण्याऐवजी चक्क साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड अशा वस्तू आढळल्या आहेत. महापालिकेनं पाणी वितरणासाठी विविध भागात जलकुंभ उभारले आहेत. मात्र बहुसंख्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळं पाण्याच्या टाक्यांवर गर्दुले, मद्यपी आणि टवाळखोरांचा वावर असल्याच्या तक्रारी आहेत. डोंगरीपाडा येथील वामननगर परिसराला गेल्या काही दिवसांपासून अपु-या दाबानं पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. पण पाण्याचा पुरेसा दाब असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात होतं. त्यानंतर डुंबरे यांच्या मागणीवरून जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वामननगर परिसरात जलवाहिनीतून साड्या, टाकाऊ कपडे, उशीची कव्हर्स, आधारकार्ड अशा धक्कादायक गोष्टी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिकेकडून शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जातात मात्र महापालिकेनं जलकुंभावर सुरक्षा रक्षक नेमले नसल्यामुळं असा प्रकार होत असल्याचा संशय मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: