मुरबाड तालुक्यातील टोकवडे गावातील २ वर्षीय तनुजा उगाडाचा वाढदिवस एका अर्थानं आगळावेगळा ठरला. या वाढदिवसाला वाढदिवसाचं गाणं अथवा केक कापणं असं काही झालं नाही. मात्र पावसाने लावलेली हजेरी आणि गाव-यांना मिळालेले सौर कंदिल यामुळे हा वाढदिवस उजळून गेला. व्हीव्हीयाना मॉलनं मोहवाडी आणि पारधवाडी मध्ये दीपावलीचं औचित्य साधून सौर कंदिलांचं वाटप केलं. त्यावेळी तनुजा ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. यावेळी उपस्थित लहान मुलांना कॅडबरी तसंच शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. त्यामुळं या मुलांच्या चेह-यावर हास्याची लकेर उमटली होती. स्वातंत्र्यांपासून या गावांमध्ये वीज नसून वीजेच्या अभावी तिथे अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. या सौर कंदिलांमुळे गावक-यांना प्रथमच दिव्यांचा उत्सव अनुभवायला मिळाल्याची प्रतिक्रिया उपसभापती सीमा घरत यांनी व्यक्त केली. गावामध्ये वीजेचं बील भरणं शक्य नसल्यामुळं सौर कंदिल हे गावक-यांच्या दृष्टीनं उपयुक्त ठरले आहेत. गावातील घरांना दरवाजा, खिडक्या नसणं तसंच साप-विंचवांचा वावर यामध्ये हे सौर कंदिल आशेचा किरण ठरले आहेत.
