जिल्ह्यातील दोन धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा झाला कमी

जिल्ह्यातील २ धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या बारवी आणि आंध्र धरणातून जवळपास महिनाभर मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसलं गेल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागानं काढला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम प्राधिकरण, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं त्यांना मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा केल्याचं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आहे. या पाणी पुरवठा करणा-या संस्थांनी त्यांना मंजूर केलेल्या पुरवठ्यापेक्षा २० टक्के अधिक पाण्याचा उपसा केला आहे. त्यांनी आत्तापर्यंत उपसा केलेला पाणी पुरवठा हा कल्याण आणि डोंबिवली शहराच्या रोजच्या पाणी पुरवठ्याइतका असल्याचा निष्कर्षही पाटबंधारे विभागानं काढला आहे. यंदा पाऊस नेहमीपेक्षा लवकर गायब झाल्यामुळं धरणातून पाणी सोडावं लागत आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत उल्हास नदीच्या पात्रात चांगलं पाणी असतं. पण यंदा सप्टेंबर मध्ये फारसा पाऊसच न झाल्यामुळे उल्हास नदीच्या पात्रातील पाणी साठा कमी झाल्यानं पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी धरणातून पाणी सोडावं लागत आहे. पाण्याचा जादा उपसा झाल्यामुळे पुढच्या वर्षीच्या पावसापर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. बारवी धरणात सध्या ९२ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच काळात १०० टक्के पाणी साठा होता. आंध्र धरणात सध्या ८७ टक्के पाण्याचा साठा असून गेल्यावर्षी तो ९७ टक्के होता. त्यामुळं गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा ८ ते १० टक्के कमी झाल्याचं दिसत आहे. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आहे त्या पाण्याचा योग्य वापर व्हावा असं सांगितलं जात आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: