भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात अटक

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. ठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांच्यासह प्रदीप पाटील यांना हिरानंदानींकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या खंडणी प्रकरणी आणखी २२ आजी-माजी नगरसेवक पोलीसांच्या रडारवर असल्याचं सांगितलं जातं. आता या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना अटक झाली आहे. विविध बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात माहिती अधिकारात अर्ज करून त्यांना ब्लॅकमेल केलं जात असे. त्यांच्याकडून अपेक्षित रक्कम मिळाल्यानंतर तेच दस्तऐवज दुस-या माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे सोपवले जात असत. यासाठी ही मंडळी वेलकम टू ठाणे अशा सांकेतिक शब्दाने एकमेकाला संकेत देत असत. ठाणे महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज करणं आणि त्यानंतर खंडणी उकळण्यामागे मोठं रॅकेट असल्याचा पोलीसांचा संशय असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: