विना परवाना शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेचे पती नितीन पगारे यांच्यासह मध्य रेल्वेचा ठेकेदार राकेश साळुंखे या दुकलीला ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. या दोघांना उपवन तलाव परिसरातून अटक करण्यात आली. ठेकेदार साळुंखे यानं ४० ते ५० बेरोजगारांना रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून प्रत्येकी २ लाख रूपये उकळले होते. पोलीसांनी या दोघांकडून २ पिस्तुल, १ रिव्हॉल्व्हर, रेल्वेची कॉललेटर्स, बनावट रबरी शिक्के हस्तगत केले आहेत. राकेश साळुंखे याच्यावर मोठं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं नोकरीचं रॅकेट सुरू केल्याची कबुली दिली आहे. नितीन पगारे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका सोनी पगारे यांचा पती असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
