खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधकांकडे मांडल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या

ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार आणि रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मांडल्या. तसंच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांचीही भेट घेऊन त्यांच्याही या समस्या निदर्शनास आणून दिल्या. ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई नंतर रेल्वे प्रशासनाला जास्त उत्पन्न मिळवून देणारे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज ६ ते ८ लाख प्रवासी ये -जा करीत असतात. नवी मुंबई येथे जाणारे प्रवासी सुद्धा ठाणे रेल्वे स्थानकात उतरून प्रवास करतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता ठाणे – मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक आणि ऐरोली कळवा एलिव्हेटेड या प्रकल्पाची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस धोकादायक झालेली इमारत पाडण्यात आली असून नवीन इमारत उभी करण्यासाठी रेल्वे लाईन डेव्हलपमेंट विभागामार्फत आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. खासदार राजन विचारे यांनी हेरिटेज लुक असलेल्या इमारतीचा आराखडा या बैठकीत सादर केला. लवकरच यास मान्यता मिळवून या इमारतीचे काम सुरु करू असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. ठाणे रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेले कल्याण आणि मुंबई दिशेस पादचारी पुलाचे काम संथपणे सुरू असल्यामुळे फलाटावरील पत्रे काढल्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू करून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यामुळे लवकरात लवकर पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच या पुलाच्या उभारणीसाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला ८ कोटी वर्ग केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी विचारे यांनी आयुक्तांशी चर्चा करून रेल्वेकडे लवकरात लवकर जमा करण्याची विनंती केली. ठाणे रेल्वे स्थानकावर ६ ते ८ लाख प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आर पी एफ सुरक्षारक्षक मनुष्यबळ ७० असल्याने खंत व्यक्त केली असून सुरक्षारक्षक वाढविण्यात यावे अशी विनंती केली.तसेच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यात यावी. त्याचबरोबर प्रवाशांना सोयीस्कर पडेल या दृष्टिकोनातून तक्रार निवारण केंद्र उभे करावे जेणेकरून रेल्वे स्थानकात होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकेल. रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर आरपीएफची सुरक्षा असणे अनिवार्य असल्याचे तसेच रेल्वे आणि महापालिका नोडल ऑफिसरची नेमणूक करा अशी विनंती विचारे यांनी केली. तिकीट खिडकीवर पिकअवर्स मध्ये असणाऱ्या स्टाफची संख्या वाढविण्यात यावी किंवा रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यु टी एस प्रणाली मार्फत तिकीट काढून घेण्याची सुविधा सुरू केली आहे. त्याचे एजन्सी मार्फत ठीकठिकाणी जनजागृती कक्ष उभारून प्रवाशांना मोबाईल मार्फत तिकीट कसे काढता येईल यांचे मार्गदर्शन करावे असं सांगितलं. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे दर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या दराप्रमाणे लागू केल्यामुळे मेमू रेल्वे गाड्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव तिकिटाचा नाहक भार सहन करावा लागत आहे. यामुळे विचारे यांनी या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे रेल्वे तिकीट दर कमी करण्याची मागणी केली. बनारस, जौनपुर, आजमगढ, येथे जाण्यासाठी एल टी टी बनारस एक्स्प्रेस या ट्रेनला येताना आणि जाताना ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणीही विचारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात भारतातील पहिले वातानुकूलित शौचालय बांधण्यात आले होते. ते शौचालय सुरू झाल्यापासून त्याची पाच वर्षाची निविदा संपेपर्यंत व्यवस्थित सुरळीत सुरू होते त्यानंतर रेल्वेने वातानुकूलित शौचालय सुरू ठेवणे गरजेचे होते. परंतु त्याचे रूपांतर साध्या शौचालयामध्ये केले आहे ते पुन्हा वातानुकूलित करून प्रवाशांना चांगली सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनुसार फलाट क्र. ७, ८ आणि ५, ६ वर दिव्यांग आणि महिलांसाठी नवीन स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच ठाणे स्थानकामध्ये काही वर्षांपूर्वी दोन लिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या लिफ्ट वारंवार बंद असल्यामुळे विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. हे निदर्शनास आणून दिले. तसेच मुंबई व नवी मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आणि लोकलला एसी चे २ किंवा ३ डब्बे जोडण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.कळवा एलिव्हेटेड या प्रकल्पातील दिघा स्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे. ३१ डिसेंबर पर्यंत काम पुर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले असून नवीन वर्षात दिघा रेल्वे स्थानक सुरू करा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. नवी मुंबई रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सिडकोने विकसित केलेल्या सर्व रेल्वे स्थानकात सरकते जिने बसविण्यासाठी सिडको मार्फत निविदा प्रक्रिया सुरु आहे. लवकरच या सर्व रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्याचे काम सुरु होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading