एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार

एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात आता ४५ चारचाकी आणि ६० दुचाकी वाहनं एमडीटी आणि जीपीएस यंत्रणेसह सुसज्ज करण्यात आली आहेत. नियंत्रण कक्षामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून त्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून तांत्रिक सहाय्यासाठी तंत्रज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ११२ क्रमांकावर केलेल्या दूरध्वनीमुळे या अत्याधुनिक सुविधेमुळं कमी वेळात पोलीसांची मदत उपलब्ध होणार आहे. ऑक्टोबरमध्ये नागरिकांना मदत पोहचवण्यासाठी सरासरी ४ मिनिटं २० सेकंद असा वेळ लागत होता. ठाणे पोलीस नियंत्रण कक्षास रोज अडीचशे ते तीनशे तर महिनाभरात एकूण ८ हजार १७५ दूरध्वनी आले होते. आता मदतीसाठी लागणारा वेळ आणखी कमी करण्याचा ठाणे पोलीसांचा प्रयत्न आहे. वरिष्ठ अधिका-यांकडून रोज आढावा घेऊन संबंधितांना व्यक्तीगत मार्गदर्शन केलं जात आहे. सर्व पोलीस ठाणी आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना प्रतिसाद, वेळ कमी करण्यासाठी सांगितलं जात आहे. संपूर्ण राज्यामध्ये आता मदतीसाठी ११२ हा क्रमांक ठेवण्यात आला आहे. ठाणे पोलीसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यात नागरिकांना पोलीस मदत पोहचवण्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आता प्रथम आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading