आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या सुशोभीकरणास सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेप्रमाणे ठाणे शहरात सौंदर्यीकरणाच्या कामास सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आनंदनगर ते माजिवडा पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा काम सुरू झाले असून आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामाची पाहणी केली. आनंदनगर नाक्यापासून पाहणी दौरा सुरू झाला.
ठाण्यात प्रवेश करतानाच रस्त्याची कमी – जास्त असलेली पातळी तसंच खडबडीत रस्त्याचा हा पट्टा तातडीने दुरुस्त करावा. तसेच दिशादर्शक फलकांची पुरेशी आणि सहज दिसतील अशी मांडणी केली जावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचे सौंदर्यीकरण रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत झाले पाहिजे. कोणतेही काम उत्तम दर्जाचेच झाले पाहिजे. त्यात कुठेही तडजोड नको असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रवेशद्वारापाशी उभ्या राहणाऱ्या २५ मीटर उंचीच्या दीपस्तंभाच्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला. माजिवडा नाका येथील रंग, चित्रे यांची संकल्पना, उपयोगात नसलेले जाहिरातींचे स्टँड, जुन्या चौक्या हटवणे याबद्दल अधिकारी आणि कंत्राटदार यांनी विचारपूर्वक कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान, ठिकठिकाणी डेब्रिज, मातीचे ढिगारे पडलेले निदर्शनास आले. तसेच, सर्व पुलांवर माती साठून त्या धुळीचा त्रास होत असल्याचेही आयुक्तांनी पाहिले. त्यावर, सफाई कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम करून पुलांवरील माती हटवली जाईल अशी व्यवस्था करण्यास नौपाडा आणि माजिवडा येथील उपायुक्तांना सांगितले. तसेच सगळीकडे पडलेले डेब्रिज तातडीने हटविण्याचे निर्देशही दिले. हे काम मोहीम म्हणून हाती घेतले तरच सुशोभीकरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने झळाळी प्राप्त होईल. त्याचा परिणाम जाणवेल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले. तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन आणि माजीवडा जंक्शन ही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जंक्शन आहेत. नागरिक आणि वाहन यांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे सोंदर्यीकरणाच्या कामात या जंक्शनला प्राधान्य देण्यात यावे. येथील चौकामध्ये लावण्यात आलेल्या सिग्नल आणि कॅमेऱ्याच्या खांबांमुळे त्या चौकाच्या सौंदर्यास बाधा येत असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. हे सिग्नल आणि कॅमेरे पुलालाच योग्य पद्धतीने लावता येतील का हे पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तीन हात नाका येथील निवास करून राहणारे भिकारी, पकडून आणलेल्या गाड्या हटविण्याच्या सूचनाही वाहतूक पोलिसांना दिल्या. शहरातील भिंतीवर जुन्या झालेल्या चित्रांचे रंगकाम याचप्रमाणे थ्री डी चित्रांचे प्रमाण मोजेकच पण ठळकपणे दिसणारे असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. उड्डाणपुलाखाली असलेली उद्याने, सेवा रस्त्यालगत नव्याने विकसित केलेली उद्याने दररोज स्वच्छ झाली पाहिजेत. ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी लावलेले डबे वेळच्यावेळी रिकामे झाले पाहिजेत. या सगळ्याची जबाबदारी स्थानिक स्वच्छता निरीक्षकांवर राहील त्यात कोणतीही हयगय नको असा इशाराही आयुक्तांनी दिला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये सर्वाधिक वर्दळीच्या भागाला प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचे सौंदर्यीकरण प्राधान्याने होत आहे. टप्प्याटप्प्याने शहरभरात सगळीकडे हा कार्यक्रम राबविला जाईल असंही अभिजित बांगर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading