कोरोना महामारीच्या परिप्रेक्षात आपण सर्वांनी शारीरिक आरोग्य बद्दल जागरूक असणं गरजेचं असून पालकांनी देखील विद्यार्थ्यांसोबत क्रीडांगणावर येऊन शारीरिक क्षमता वृद्धिंगत करावी असा सल्ला क्रीडा पटू ललिता बाबर -भोसले यांनी दिला. विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रबोधिनीचे अर्जुन पुरस्कार विजेत्या तसंच सध्या उरणच्या प्रांताधिकारी असलेल्या ललिता बाबर-भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. ग्रामीण भागातून येऊन क्रीडा क्षेत्रात आज जे नाव कमावले आहे त्यामागे आपली जिद्द,मेहनत, शिस्त आणि योग्य नियोजनाचा महत्वाचा वाटा असल्याचे ललिता बाबर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबत शारीरिक सुदृढता लागण्यासाठी खेळांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे क्रीडा संस्कृती ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या हेतूने विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी डॉ महेश बेडेकर यांच्या प्रयत्नातून ही क्रीडा प्रबोधिनी साकारली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास, खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे शारीरिक सुदृढता वाढण्या सोबतच खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी देखील क्रीडा प्रबोधिनी उपयोगी ठरेल असं महेश बेडेकर यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले जंक फूड टाळावे आणि क्रीडांगणावर जाऊन भरपूर खेळावे. सुदृढ शरीरातच निरोगी आणि ऊर्जस्वल मनाचा वास असतो असं विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष विजय बेडेकर यांनी सांगितलं. आरोग्य आणि खेळाचे महत्व सांगून क्रीडा प्रबोधिनी च्या कार्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्ट्रायडर्सच्या दीपक लोंढे यांनी केले.