​दिल्ली सोडा आधी गल्लीतली निवडणूक जिंका – राजेंद्र साप्ते यांचा आनंद परांजपे यांना टोला

कळव्यातील एका प्रभागात शिवसेनेने राबविलेल्या लसीकरण मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघून पायाखालची वाळू सरकलेल्या राष्ट्रवादीने २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये शिवसेनेला त्रास देण्याची भाषा करणे हे हास्यास्पद आणि केविलवाणे आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्या आनंद परांजपे यांना शिवसेनेने धूळ चारली त्यांच्या तोंडी तर ही भाषा मुळीच शोभत नाही. राष्ट्रवादीने कागदी घोडे नाचविण्याचे काम परांजपे यांना दिलेले आहे. त्यामुळे निवडणूकीच्या रणांगणात कसे लढायचे हे शिकविण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. शिवसेनेतून गेल्यानंतर दिल्लीत जाण्याचे त्यांचे स्वप्न आता स्वप्नातही साकार होणार नाही. त्यामुळे आता गल्लीतली नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून त्यांनी आपली अस्तित्व टिकवून ठेवावे अशी खरमरीत टिका शिवसेनेच्या राजेंद्र साप्ते यांनी केली आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने कळव्यात झालेल्या लसीकरणामुळे राष्ट्रवादीला पालिका निवडणूकीत पराभवाची चाहूल लागली आहे. त्यामुळेच अगतीक झालेल्या राष्ट्रवादीने पोकळ धमक्या देण्यास सुरूवात केल्याचे साप्ते यांनी सांगितले. परांजपे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा दोन वेळा लोकसभेच्या निवडणूकीत शिवसैनिकांनीच त्यांना निवडून दिले होते. परंतु, त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी मारली आणि तोंडावर आपटले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणूकांमध्ये शिवसेनेने त्यांना धूळ चारून त्यांचे दात घशात घातले होते.  आता पाचपखाडीतल्या गल्लीतले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुध्दा त्यांना भाव देत नाहीत. याचा प्रत्यय त्यांना पदोपदी येत असेलच. त्याशिवाय त्यांच्या शहर अध्यक्षपदाच्या खुर्चीखाली त्यांच्याच पक्षातील पदाधिका-यांनी लावलेले फटाके जर फुटले तर भलतीच नाचक्की होईल. त्यामुळे आम्हाला मदत करण्याऐवजी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी असा चिमटा राजेंद्र साप्ते यांनी काढला आहे. निवडणूका लढण्याची, जिंकण्याची किंवा प्रतिस्पर्ध्याला हरविण्याची भाषा परांजपे यांच्यासारख्या जनाधार नसलेल्या मंडळींच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना लसीचे डोस मिळत नसतील तर शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजीत केल्या जाणाऱ्या लसीकरण शिबिरांमध्ये पाठवून द्या. आम्ही त्यांचे लसीकरण करू. त्याचे राजकारण करणार नाही. ती लस तुमच्या कार्यकर्त्यांना बाधणार नाही याची गॅरण्टी आम्ही देतो असा टोलाही राजेंद्र साप्ते यांनी लगावला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading