६ दिवसांत ९३६० बाटल्या रक्तसंकलन

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहात सहा दिवसांत ९ हजार ३६० बाटल्या रक्तसंकलनाचा टप्पा गाठला. आज सहाव्या दिवशी ठाणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि पालघर आणि नवी मुंबईतील शिवसैनिकांनी या महारक्तदान सप्ताहात सहभाग घेतला. आज सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी रीघ शिवाजी मैदानाबाहेर लागली होती. यात प्रमुख्याने ठाणे पोलिस दलातील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन रक्तदानाचे कर्तव्य बजावले. सध्या नवरात्र आणि कोरोना नियमनांचे पालन अशी दुहेरी जबाबदारी नेटाने पार पाडत असतानाच पोलिस दलाने रक्तदानात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. फक्त पोलिस कर्मचारीच नव्हे, तर पोलिस अधिकारी देखील रक्तदानाच्या महायज्ञात स्वतःहून सहभागी झाले. यात ठाणे शहराचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे, ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त सोनाली लोंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, रामराव सोमवंशी, संजय धुमाळ, मनोहर आव्हाड अशा अनेक अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. याशिवाय शीघ्र कृती दलाचे कमांडो देखील रक्तदानात सहभागी झाले. कर्तव्यभावनेचे भान बाळगत या महारक्तदान सप्ताहात सहभागी होऊन योगदान दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि जवानांचे आभार मानले. राज्यावर, देशावर कोणतंही संकट असो, कोरोनाची साथ असो किंवा पूर, वादळ अशी नैसर्गिक आपत्ती असो, पोलिस कायमच लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. आज रक्तदान सप्ताहात देखील सहभागी होऊन पोलिसांनी तेच भान कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. आज दिघे साहेबांची विशेष आठवण येत असून त्यांनी सुरू केलेला नवरात्रौत्सव आज खऱ्या अर्थाने मोठा झाला असल्याचे समाधान वाटत असल्याची भावना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. पोलिसांप्रमाणेच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही बुधवारी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले. याशिवाय ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील आज रक्तदान करून योगदान दिले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading