५४व्या नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या पराग बद्रिकेनं

कोणतेही कौशल्य हे तांत्रिक असू नये, ते ह्रदयाला स्पर्श करणारे हवे. हाच नियम वक्तृत्वालाही लागू आहे. त्यामुळे तंत्रात न हरवता सहजतेने बोलले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संजीव लाटकर यांनी ठाण्यात केले. ५४व्या नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे होते. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या पराग बद्रिके याने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तर, कनिष्ठ गटात रूईया महाविद्यालयाच्या सिध्दी मयेकर हिने बाजी मारली. वाचन, चिंतन, मनन, स्मरण आणि विश्लेषण या पाच सूत्रांचा वापर वक्त्यांनी करावा. त्यातून त्यांना वक्तृत्व ही पदवी मिळवणे हे साध्य होईल, शिवाय, संवाद ही पीएचडी मिळवणे शक्य होईल असेही लाटकर यांनी स्पष्ट केले. व्यक्तिमत्व विकासापासून ते वक्तृत्वाचा व्यावसायिक वापर या सर्व पैलूंबाबत लाटकर यांनी मार्गदर्शन केले. ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कनिष्ठ आणि पदवी गटात मिळून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात ठाणे, मुंबईसह चिपळूण, नाशिक, पुणे, उस्मानाबाद येथील स्पर्धकांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी ही स्पर्धा प्रत्यक्ष घेण्यात आली. पदवी गटात पराग बदिरकेला प्रथम, वृषभ चौधरी द्वितीय, यश पाटील तृतीय तर प्रतिक्षा गायकवाडला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कनिष्ठ गटात रूईयाच्या सिध्दी मयेकरला प्रथम, आभा भोसलेला द्वितीय, सृष्टी शिंदेला तृतीय तर स्वरा पाटीलला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading