१२ तासात खड्डे भरण्याचे सूत्र स्वीकारण्याच्या आयुक्तांच्या सूचना – रस्ते दुरूस्तीसाठी मास्टीक तंत्र परिणामकारक

रस्ते दुरुस्तीसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात मास्टिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्याचा आतापर्यंत चांगला परिणाम दिसला असून मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांनीही तोच पर्याय वापरावा आणि रस्ता खराब असल्याचे आढळल्यापासून १२ तासांच्या आत त्या रस्त्याची दुरुस्ती केली जावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेसह निरनिराळ्या सरकारी संस्थांकडे रस्ते आणि पूल यांचे व्यवस्थापन आहे. मात्र रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आल्यावर कोणाचीही वाट न पाहता नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तो रस्ता दुरुस्त केला जावा असे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. रस्त्यावरील खड्डा सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेऊन खड्ड्यांबद्दल पराकोटीची असहनशीलता ठेवा आणि काम करा याचा पुनरुच्चार आयुक्तांनी सर्व यंत्रणाच्या बैठकीत केला. आपापल्या हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करून आवश्यकता असेल तिथे दुरुस्तीचे नियोजन करावे. ना दुरुस्त रस्त्यांबद्दल नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. त्याची दखल घेवून सतर्क राहायला पाहिजे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्याबद्दल आपण नागरिकांच्या प्रती उत्तरदायी आहोत याची सर्व यंत्रणांनी जाणीव ठेवावी. लोकांना त्रास होण्यापूर्वीच रस्ते दुरुस्तीची कारवाई झाली पाहिजे असे प्रतिपादन आयुक्तांनी केले. महापालिकेतर्फे रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पध्दतीचा अवलंब करीत आहे. डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले तेथे चांगला परिणाम दिसला आहे. कोल्डमिक्स पद्धतीने केलेली दुरुस्ती अतिवृष्टीत टिकत नाही त्याशिवाय, मास्टिक हे कोल्डमिक्सपेक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी त्याचा वापर करावा, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. मेट्रो मार्ग हा एकरेषीय आणि रस्त्याच्या ठराविक भागात आहे. त्यामुळे त्या खालील रस्त्याचे नियोजन इतर रस्त्यांच्या तुलनेने सोपे आहे. मेट्रोची यंत्रणा आणि उपलब्ध साधन सामुग्री लक्षात घेता त्यांनी रस्ते दुरुस्तीचा आदर्श घालून द्यावा. म्हणजे इतर यंत्रणांना त्या कामाचा दाखला देऊन तसे काम करून घेता येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मेट्रोचे बॅरिकेड्स हटवावे. तसेच, ज्या भागात खोदकाम अर्धवट आहे तिथे काम थांबवून रस्ता वाहतूक योग्य करावा अशा सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading