हरणाचे कातडे आणि सांबार आणि बारशिंगच्या शिंगासह तिघांना अटक

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर हरणाचे कातडे आणि सांबार आणि बारशिंगच्या शिंगासह तिघांना मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५० लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर गस्त घालत असताना खब-याने हरणाचे कातडे आणि सांबरांची शिंगं घेऊन स्विफ्ट डिझायर कारमधून काही व्यक्ती येत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हे गस्तीपथक शिळफाट्याकडून मुंब्रा स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर सापळा रचून वाट पाहत होते. माहितीनुसार पांढ-या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी बाह्यवळणावर येताना दिसली. पोलीसांनी कारला थांबवले. कारमधून महम्मद सौदागर, शेख नासीर आणि रिझवान अहमद अशा तिघांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत काळ्या रंगाची मोठी पिशवी आणि पांढ-या रंगाची एक प्लास्टीकची गोणी आढळली. ही पिशवी आणि गोणी उघडली असता त्यामध्ये हरणाची कातडी आणि सांबार प्राणाची बारशिंगे मिळाली. हरणाचं कातडं हे ओलसर आणि ताजं असल्याचं दिसून आलं. कातड्याची लांबी ५३ इंच इतकी होती. या कातड्याची स्थानिक बाजारपेठेत ४७ लाख रूपये किंमत असून सांबराची १२ शिंगांची किंमत ५ लाख रूपये असल्याचं पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितलं. या तिघांविरोधात वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading