स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता आणि अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ठाणे शहर भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील विविध भागात रॅलींबरोबरच मान्यवर व्यक्तींकडे तिरंगा मानाने सुपूर्द केला जात आहे. त्याचबरोबर अमृत महोत्सवानिमित्ताने `हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉईंटसह तिरंगा रथ तयार केला आहे. या रथाचे आणि तिरंगा रॅलीचे फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. तिरंगा हा अस्मिता आणि अभिमानाचे प्रतिक आहे. देशाचा सैनिक हा तिरंगा फडकविण्यासाठी लढतो. मात्र हरलो तर तिरंग्यात देह लपेटला जाईल अशी सैनिकाची भावना असते. राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा मानसन्मान वाढविण्यासाठी, ठाण्यातील प्रत्येक घरी तिरंगा फडकवावा. त्याचबरोबर अमृत महोत्सवानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बलशाही महाराष्ट्र आणि बलशाही राष्ट्र घडविण्याचा संकल्प करूया असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपा ठाणे शहराच्या वतीने `हर घर तिरंगा’ अभियानानिमित्ताने मंडलनिहाय प्रभातफेरी, तिरंगा रॅलीसह डॉक्टर व मान्यवर व्यक्तींना तिरंगा सन्मानाने प्रदान करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कोपरी आणि राबोडी येथे भव्य रॅली काढून तिरंगा फडकविला गेला. या अभियानाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या विविध भागात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading