समाजात व्रत घेऊन कार्य करणा-या ४ कार्यकर्त्यांचा वुई नीड यू सोसायटीतर्फे सत्कार

वी नीड यू सोसायटी’तर्फे गेली आठ वर्षे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची योग्य दखल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना एका समारंभात गौरविण्यात आले. युसुफ मेहेरअली केंद्राचे सचिव या नात्याने देशातील नऊ राज्यांमधे ग्रामोद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा अनेक मुद्द्यांवर कार्य करणारे मधुकर मोहिते यांना गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत आपल्या मार्गावर ठामपणे वाटचाल केल्याबद्दल ‘विशेष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली दोन दशके मुंबईमधील वंचित, गरीब जनसामान्यांसाठी पाणी हक्काचे काम करणारे सीताराम शेलार यांना समाजव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘पाणी हक्क समिती’ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देतांना मुंबई उच्च न्यायालयाने ‘महानगरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग तिचे वास्तव्य अधिकृत असो की अनधिकृत महापालिकेने पाणीपुरवठा केला पाहिजे’ असा ऐतिहासिक निकाल दिला होता.
जगातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा डोळ्यांचा फिरता दवाखाना सुरू करणाऱ्या डॉ. प्रशांत थोरात यांना कार्यव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रभात ट्रस्टच्या मार्फत मोफत चश्मा वाटप, अत्यल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया, कोव्हिडच्या काळात धान्यवाटप, लसीकरण, रक्तदान शिबिरे, मोफत एक्स-रे, औषध वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. जिल्हा परिषद शाळेत काम करत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘वयात येताना’, ‘जोडीदाराची विवेकी निवड’, ‘पुरुषभान संवाद’, ‘प्रेमात पडताना’, असे अनेक विधायक उपक्रम राबवणाऱ्या आरती नाईक यांना शिक्षणव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधारणावादी विचार तरुणांपर्यंत पोहवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कथाकार, लेखक भारत सासणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्काराने सन्मानित कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, या कार्यकर्त्यांनी सांगितलेले आपल्या सभोवारातील अनुभव अंगावर येणारे आहेत. समाजाचे वेगवेगळे कुरूप चेहरे दाखवणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या भाषणाबाबत समाजाने चिंतनशील होणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितलेले सत्य ऐकण्यासाठी समाजाकडे विवेकाचा कान असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading