स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेतर्फे मोटर सायकल रॅली, पेट रॅली, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी एकदाच वापर करून फेकून देणा-या प्लास्टीकचा वापर बंद करावा तसंच ठाणे शहर प्लास्टीकमुक्त करावे असा संदेश एका बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जनजागृतीपर बाईक रॅलीत महापालिका अधिकारी, कर्मचारी तसंच परिवहन सेवेचे दीडशे जण सहभागी झाले होते. तर महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून पेट रॅली, तलावांची स्वच्छता मोहिम आणि कार्यालय स्वच्छता अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरूवात महापालिका भवनापासून झाली. तर गडकरी रंगायतन येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी एकदा वापर करून टाकून देण्यात येणारे प्लास्टीक आपण वापरणार नाही आणि स्वत: तसंच दुस-यांना सुध्दा प्लास्टीकचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहित करू आणि आपले शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू अशी शपथ देण्यात आली. शहरातील सर्व घाट, तलावांच्या ठिकाणी स्वच्छता रॅली राबवण्यात आली. महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सहभागी झाले होते. प्लास्टीक वापर टाळा, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे असे संदेश देत शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी रॅली काढल्या होत्या. शहरातील रस्त्यांवर पडलेले प्लास्टीक प्राण्यांनी खाऊ नये म्हणून प्लास्टीकचा वापर करू नये यासाठी शहरातील प्राणी प्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांसह या रॅलीत सहभागी झाले होते. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कल अशी रॅली काढण्यात आली होती. शहरातील नाट्यगृह, चित्रपटगृहांमध्ये प्लास्टीकचा वापर करू नये अशी शपथ प्रेक्षकांना देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading