स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले असल्याने, समाजाने स्त्री – पुरुष समानता आचरणात आणावी

स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे नाव कमवत आहेत. शारिरीक, मानसिक क्षमता असो किंवा शैक्षणिक, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासनिक आदी जवळ जवळ सर्वच क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. त्यामुळे स्त्रिया एक माणूस म्हणून पुरुषांच्या पेक्षा कुठेही कमी नाही. प्रजनन अवयव सोडल्यास स्त्री-पुरुषात काहीही नैसर्गिक भेद नाहीत. तरीही महिलांबरोबर आजही भेदाभेद केला जातो. शिक्षण, जेवण, पगार, घरातील निर्णय प्रक्रिया या बाबत भेदाभेद आज ही अस्तित्वात आहे. घर दोघांचे, मुलं दोघांची मग जास्त जबाबदारी स्त्रीकडेच का जाते? असे प्रश्न उपस्थित करत, स्त्री पुरुष समानता म्हणजे दोघांना समान संधी आणि समान सम्मान असणे आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले असल्याने, समाजाने स्त्री – पुरुष समानता आचरणात आणावी,असं मत आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक उल्का शुक्ल यांनी मांडले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या युवा मेळाव्यात स्त्री – पुरुष समानता, समाजाला देईल सुदृढता, या विषयावर बोलतांना व्यक्त केले. उपस्थित मुली- मुलांचे गट बनवून, जन्माला आल्या पासून वीस वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यावर मुली- मुलांची वाढ होत असतांना त्यांच्या शारिरीक, मानसिक स्थिती, अनुकरण आणि स्वभाव तसंच वागणूकीत होणारे बदल या बाबतीत त्यांनी सर्वांना बोलतं केलं. बाळाच्या पालन पोषणाची प्रक्रिया घडताना कुटुंबात मुलगी म्हणून दुय्यम वागणूक मिळते का? मूल हवे की नको? आदी बाबत कुटुंबात चर्चा होते का? स्त्रीचा स्वतःच्या शरीरावर हक्क आहे का? गर्भ धारणा करणे किंवा गर्भपात करणे हा स्त्रीचा हक्क आहे का? आदी प्रश्नांवरही चर्चा घडवून मुलांना बोलतं केलं गेले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading